शाहिद आफ्रिदीकडून क्रिकेटप्रेमींची फसवणूक

लाहोर : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याने एक आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. शाहीद आफ्रिदीचे आत्मचरित्र ‘गेम चेंजर’ नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये अनेक विषयांवर खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे शाहिद आफ्रिदी याचं खरं वय समोर आलं आहे. नव्या जन्मतारखेच्या खुलाशामुळे आफ्रिदी आता थेट पाच वर्षांनी मोठा झाला आहे . त्याने आत्मचरित्रात जन्मतारखेचा उल्लेख केला मात्र तारीख आणि महिन्याबाबत काहीही उल्लेख केलेला नाही.

क्रिकेटच्या एका अधिकृत वेबसाईटवर तो १ मार्च १९८० जन्मला असून त्यानुसार तो सध्या ३९ वर्षांचा असल्याचं दाखवले जात आहे. मात्र त्याने आत्मचरित्रात आपल्या खऱ्या जन्मतारखेचा उल्लेख केला आणि क्रिकेटमधील एका मोठ्या रहस्यावरील पडदा दूर झाला आहे. या नव्या जन्मतारखेनुसार आफ्रिदीचे सध्याचे वय हे ४४ आहे.

१९९६ मध्ये नैरोबीत श्रीलंकेविरुद्ध अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकवण्याचा विक्रम केला, तेव्हा आफ्रिदी १६ वर्षांचा नव्हता, हे त्याच्या ऑटोबायोग्रफीत उघड झाले आहे. ‘गेम चेंजर’ असं या आत्मचरित्राचं नाव आहे. त्यात आफ्रिदी लिहितो, ‘मी तेव्हा १९ वर्षांचा होतो, १६ नव्हे. माझा जन्म १९७५ सालचा आहे.’ तो जर खरेच १९७५मध्ये जन्मला असेल तर त्याने वयाच्या १६वर्षी नौरेबिविरुद्ध झळकावलेल्या शतकाचा विक्रम खोटा ठरतो. विशेष म्हणजे तो विक्रम तब्बल १७ वर्षे त्याच्या नावे होता. यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आफ्रिदीने फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे.