काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मध्ये नाशिकमध्ये चक्क नोटांचा पाऊस ? शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांपर्यंत पोहचला असून कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहे. नागरिकांना घाबरून न जाता घरात राहण्यास सांगितले जात आहे. मात्र, नाशिकमध्ये एका शिवारातील शेतात अर्धा किलोमीटर 20, 50, 100, 500 आणि 2000 च्या नोटा शेतात पसरवण्यात आल्या. शेतात नोटा पसरवण्यात आल्याचे पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नाशिकमधील सौंदाणे येथील मनमाड-चोंढी रोडलगत हांडी व हनुमान मंदिर शिवारात अर्धा किलोमिटर परिसरातील शेतात नोटा पसरविल्याचे दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये शंकेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नोटा अर्धा किलोमिटरपर्यंत पसरलेल्या दिसल्याने विविध अफवांना परिसरात उत आला होता. शेतात चलनी नोटा पसरवण्यात आल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावकऱ्यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली.

काय आहे प्रकार
शेतीचे काम करण्यासाठी येथे शेतमजूर शेतीच्या कामासाठी येत असतात. त्यांना त्या नोटा चुरगळलेल्या व ओल्या होऊन वाळलेल्या अवस्थेत दिसल्या. मजूरांनी हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर परिसराची रोडलगत पाहणी केली असता त्यांना अर्धा किलोमीटरपर्यंत सगळ्या दोन हजार रुपये किमतीच्या नोटा आढळून आल्या. कोरोनाचा प्रसार नोटांमधून देखील होतो, अशी शंका व्यक्त करत स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जमा केलेल्या सर्व नोटा जाळून नष्ट केल्या.