धक्कादायक ! पोलिसांनीच घातला धाब्यावर दारू पिऊन ‘धिंगाणा’, ४ पोलीसांचे तडकाफडकी निलंबन

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन- आजकाल पोलिसांच्या अरेरावीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीद घडली. दारू पिऊन धिंगाणा घालत नागरिकांना शिवीगाळ करण्याचा प्रकार याठिकाणी घडला. या ४ पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करत त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.बसवराज तेली यांनी दिले आहेत.

संपूर्ण राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. त्यात या पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या वर्धा येथील तळेगाव पोलीस ठाण्यात झाली होती. हे कर्मचारी आपल्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या खडका येथील राजस्थानी धाब्यावर जेवण करण्यासाठी असताना तेथे ही घटना घडली. याठिकाणी या कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन धाब्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. धाब्यावरील उपस्थित लोकांनी त्यांना शांत राहण्याची विनंती केली. त्याठिकाणी इतरही अनेक लोक जेवणासाठी थांबले असल्यामुळे त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र दारूच्या उन्मादात असणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी काहीही ऐकून न घेता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यानंतर अखेरचा पर्याय म्हणून नागरिकांनी याबाबत पोलीस ठाण्यात माहिती देत तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलीस ठाण्यातून आलेली गाडी पाहून मात्र या कर्मचाऱ्यांनी तेथून पलायन केले. हे कर्मचारी ठाण्यात आल्यानंतर ठाणेदारांनी चौकशी केली असता या कर्मचाऱ्यांचा दारू पिल्यामुळे वास येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तात्काळ त्यांच्या निलंबनासाठी कार्यवाही करण्यात आली.

निलंबनाचे अधिकार पोलीस अधीक्षकांना असल्याने या चारही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक डाॅ.बसवराज तेली यांच्या कार्यालयातून काढण्यात आले. या निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये रोशन डाहे, मनीष मांडवकर, प्रमोद हरणखेडे, पंढरी धुर्वे यांचा समावेश आहे.

वस्तुतः वर्धा जिल्हा पूर्णतः दारूबंदी झालेला जिल्हा आहे. दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. असे असताना जर पोलिसच दारू पिऊन धिंगाणा घालत असतील तर मात्र हा प्रकार धक्कादायक आहे. यामुळे वर्धेकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून आपली सुरक्षेची अपेक्षा नेमकी कोणाकडून करावी असा यक्षप्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही
रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या
हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा
निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा