OLX वर नवीन ‘क्लृप्ती’ वापरून 30 हजार रुपयांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ओएलएक्सवरून दुचाकी विक्रीची जाहिरात दिल्यानंतर त्या ग्राहकाकडून 30 हजार रुपये घेतल्यानंतर हॉटेलात बसवून दुसर्‍याच चावीने दुचाकी घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. ओएलएक्सवरून होणार्‍या गुन्ह्यांत चोरटे आता नवनवीन क्लुप्त्या वापरत आहेत.

प्रसाद नागरगोजे (वय 21, रा. एमएमसीसी कॉलेज) या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दर्शन अगरवाल (रा. वाघोली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याला दुचाकी घ्यायची होती. त्याने ओएलएक्सवर पाहणी केली. त्यावेळी एका दुचाकी विक्रीची जाहिरात पाहली. दिलेल्या क्रमांकावर तरुणाने संपर्क साधला.

त्यावेळी 40 हजार रुपयांत दुचाकीचा ठराव केला. यानंतर त्याला दुचाकी दाखविण्यासाठी विमानतळ येथील फिनिक्स मॉलजवळ बोलावले. त्याला दुचाकीची चक्कर मारण्यासाठी दिली. त्यानंतर गुगल पेद्वारे 30 हजार रुपये स्विकारले. तसेच, दुचाकी आणि तिची चावी दिली. यानंतर चोरटा या तरुणाला येथील एका हॉटेलात चहा पिण्यासाठी घेऊन गेला.

दोघे चहा पित असताना तो हॉटेलच्या दुसर्‍या दरवाजातून बाहेर आला. तसेच, दुसर्‍या चावीने दुचाकी घेऊन पसार झाला. तो परत न आल्याने तरूणाने पाहणी केली असता दुचाकी आणि तो तरूणही नव्हता. त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो झाला नाही. यावेळी त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com