बिहारमध्ये मोफत करोना लस ! भाजपच्या आश्वासनावर टीकेची झोड

पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन  –   बिहारमधील निवडणूक प्रचारात रोज नवनवीन मुद्दे येत असून त्यावर आरोप-प्रत्यरोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपने गुरुवारी ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध केले. त्यात आत्मनिर्भर बिहार असे आश्वासन देताना बिहारवासीयांना कोरोनाची मोफत लस दिली जाईल असे जाहीर केले आहे. त्यावरून राजकीय क्षेत्रात गदारोळ उडालेला आहे.

यापुढे प्रत्येकाला मोफत कोरोना लस मिळवायची असेल तर आपल्या राज्याच्या निवडणुकांचे वेळापत्रक पहावे लागेल अशी उपरोधिक टीका राहुल गांधी यांनी केली आणि भाजपकडे खोट्या आश्वासनांचा गुप्त साठा असल्याचा टोला लगावला.

सर्व भारतीयांना कोरोनाविरोधी लस रास्त आणि न्याय्य पद्धतीने देण्याचे नियोजन करण्याऐवजी भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात लसीचे राजकारण केले आहे. महामारीच्या काळातही राजकीय फायद्यासाठी एका राज्याला विशेष वागणूक देणे पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर आणि अमानुष आहे, अशी कडक टीका काँग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

आम्हाला बिहार कोरोनामुक्त करायचा आहे एवढेच उत्तर बिहारमधील भाजपचे निवडणूक प्रभारी, महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.