गुंडाशी मैत्री पडली महागात ! वर्चस्वाच्या वादातून प्रतिस्पर्धकाच्या मित्राचा केला खुन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – खरं तर त्याचा गुन्हेगारी जगताशी जराही संबंध नव्हता़ मात्र, त्याची कुख्यात गुन्हेगाराशी मैत्री होती, हाच काय तो त्याचा गुन्हा. नागपूरमधील पारडी भागातील वर्चस्वाच्या लढाईतून सुरु असलेल्या गँगवॉरमध्ये कुख्यात गुंड अक्षय येवले याने साथीदाराच्या मदतीने प्रतिस्पर्धी टोळीप्रमुखाच्या मित्राचा खुन केला. मृतदेहाला आग लावून सापळा जामठाच्या नाल्यात फेकला. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे़ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अक्षय गजानन येवले (वय २५), नीलेश दयानंद आगरे (वय१९) आणि अमोल ऊर्फ विक्की श्रीचंद हिरापुरे (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी मोनेश भागवत ठाकरे (वय २५) याचा खुन केला होता. हे सर्व जण पारडीतील भवानीनगरमध्ये राहतात.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अक्षय येवले हा पारडीतील कुख्यात गुन्हेगार आहे. मोनेशचा मित्र विनोद वाघसोबत त्याचा वाद होता. त्यातूनच अक्षयला खुनाच्या प्रयत्नाबद्दल अटक करुन तुरुंगात पाठविण्यात आले होते. त्यानंतर विनोद वाघ याने अक्षयाचा मित्र नीलेश आगरेला मारपीट केली होती. अक्षय जामीनावर सुटून आल्यावर तो बदला घेण्याचा प्रयत्नात होता. २७ नोव्हेंबर रोजी वाघ याचा मित्र मोनेश काजल बारमध्ये दारु पित बसलेला आढळून आला. हे पाहून अक्षय त्याच्याकडे गेला. मोनेशने माझ्याकडे सोन्याचे नाणे आहे. ते एका प्लॉटवर लपवून ठेवले आहे. तेथे गेल्यावर दाखवितो, असे सांगितले. तेव्हा आपल्याला मारण्याचा हा प्रयत्न असावा, अशी शंका अक्षयला आली. त्याचा डाव त्याच्यावर उलटविण्याचे अक्षयने ठरविले.

दारुच्या नशेत असलेल्या मोनेशला त्याची शंका आली नाही. ते मोनेशला एका बेवारस घरात घेऊन गेले. तेथे अक्षय व नीलेशने त्याच्यावर वार करुन खुन केला. त्यानंतर सोहम बिलोरीया याला पेट्रोल घेऊन येण्यास सांगितले. त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो मृतदेह जाळून टाकला. दुसऱ्या दिवशी ते त्या ठिकाणी गेले. तेव्हा त्यांना सापळा दिसला. त्यांनी तो एका साडीत बांधून जामठाच्या नाल्यात फेकून दिला.
मोनेशच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अक्षयला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली होती. पण, त्याने पोलिसांना काहीही सांगितले नाही़. मोनेशला २७ नोव्हेंबरला अखेरच्या वेळी अक्षय आणि त्याच्या साथीदाराबरोबर काजल बारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांनीच खुन केल्याचा पोलिसांना पक्का संशय होता. त्यांनी नीलेशला ताब्यात घेऊन आपला हिसका दाखविला. तेव्हा त्याने मोनेशचा खुन केल्याचे कबुल केले. पारडीत विनोद वाघ याचे वर्चस्व वाढत होते. त्याला राजकीय पाठबळही मिळत असल्याने अक्षय अस्वस्थ होता. पण, पारडीतील गुंडाच्या वर्चस्वातून गुन्हेगारीशी काहीही संबंध नसलेल्या मोनेश याला मात्र जीव गमवावा लागला.