आरोग्यासाठी फुल फॅटचे दुध लाभदायक ; मधुमेह, हृदयरोगासाठी चांगले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – हृदयरोग अथवा मधुमेह असणारांनी फुल फॅट असलेले दूध घेऊ नये, असा आपल्याकडे समज आहे. मात्र, एका नव्या संशोधनातून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, फुल फॅटचे दुध आरोग्यासाठी लाभदायक असून मधुमेह आणि हृदयरोग असणारांसाठी चांगले आहे. या दुधामुळे शरीराला अनेक फायदे होतात, असे कॅनडातील संशोधकांनी म्हटले आहे. शिवाय, दिवसातून तीनदा फुल फॅटचे दूध वा दुग्धजन्य उत्पादने सेवन करणाऱ्यांना लवकर मृत्यू, हृदयाचे आजार व उष्माघाताचा धोका कमी होतो, असा दावाही या शास्त्रज्ञांनी केला आहे.

फुल फॅटच्या दुधात व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम व प्रोटीनसह अनेक पौष्टिक घटक असतात. नवीन संशोधनात अशाप्रकारचे फायदे सांगितल्याने आता पूर्वी अमेरिकी बाजारात या दुधाची घटलेली विक्री वाढत आहे. ग्राहक आता अधिक फॅट असलेल्या दुधाची मागणी करू लागले आहेत. संशोधकांनी या संशोधनातून असेही निरीक्षण नोंदविले आहे की, चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांना हृदयाचे आजार, टाइप-२ चा मधुमेह व स्थूलतेचा धोका कमी असतो. कमी फॅट सेवन करणारे कॅलरीची भरपाई खराब रिफाइंड कार्बोहायड्रेट्सच्या माध्यमातून करतात.