‘कोरोना’ विरूध्दच्या लढाईत भारताची ‘भूमिका’ अत्यंत महत्वाची, G-20 देशांनी मानलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी जी -२० ग्रुपच्या सदस्य देशांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलले. ही आभासी बैठक (Virtual meeting) विशेष होती कारण या बैठकीचा केंद्रबिंदू कोरोना विषाणूमुळे पसरलेला साथीचा रोग होता. बैठकीत विविध देशांच्या प्रमुखांनी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याच्या तयारीविषयी माहिती दिली. या साथीचे मानवी आणि आर्थिक परिणाम कसे आहेत आणि कोणत्या प्रकारचे परिणाम दिसू शकतात यावर बैठकीत जोर देण्यात आला.

पंतप्रधान मोदींसह या आभासी बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे देखील उपस्थित होते. एका वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत जागतिकीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आणि ते म्हणाले की दहशतवाद असो वा हवामान बदल, अशा विषयांवर जागतिकीकरण मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले आहे.

बैठकीत पंतप्रधान म्हणाले, कोविड -१९ ने आपल्याला जागतिकीकरणाच्या नवीन संकल्पनेवर विचार करण्याची चांगली संधी दिली आहे. या संकल्पनेतून आर्थिक आणि वित्तीय बाबी सोडून मानवता, हवामान बदल आणि दहशतवाद यावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार जी -२० आभासी शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की हे व्यासपीठ आर्थिक आणि वित्तीय प्रश्नांवर उपाय म्हणून चांगला मार्ग आहे, परंतु काहीवेळा असे दिसून आले आहे की दहशतवाद आणि हवामान बदल या विषयांवर जागतिकीकरण मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले आहे.

बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना विषाणू या साथीच्या आजाराकडे सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की या साथीचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम बरेच आव्हानात्मक असू शकतात. तसेच ते म्हणाले की कोविड -१९ ची ९० टक्के प्रकरणे आणि ८८ टक्क्यांपर्यंत मृत्यूच्या नोंदी जी -२० देशांमध्ये समोर आल्या आहेत. खरं तर जगाच्या जीडीपीचा ८० टक्के हिस्सा आणि एकूण लोकसंख्येचा ६० टक्के हिस्सा याच क्षेत्राच्या अंतर्गत येतो.

पंतप्रधान मोदींनी जी -२० च्या प्रमुखांना सांगितले की कोविड -१९ चे संकट येऊन तीन महिने झाले, तरीही आपण अजून परस्पर सहकार्याचे मार्ग शोधत आहोत. ते म्हणाले की जग आपल्या एक-एक पावलांवर आणि कारवाईवर नजर ठेऊन आहे. आभासी बैठकीच्या सुरूवातीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), संयुक्त राष्ट्र संघटना (यूएन) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या प्रमुखांनीही भाषण केले. कोविड -१९ बाबत कृतीपत्र जारी करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच बैठकीत राष्ट्रप्रमुखांनी हे मान्य केले की कोविड -१९ च्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारत केवळ प्रादेशिक स्तरावरच नाही तर जागतिक स्तरावरही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या सभेला उपस्थित राहणारे कोणतेही राज्य प्रमुख हे सांगू शकले नाही की हा साथीचा रोग किती काळ टिकेल, परंतु त्यावर उपचार करण्यावर भर देण्यात येईल याबाबत सर्वांनी म्हटले आहे.