नितीन गडकरींनी ‘टक्केवारी’ खाणार्‍या ‘त्या’ नेत्याचं नाव जाहीरपणे सांगावं, शिवसेनेच्या बड्या नेत्याचं आवाहन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – नितीन गडकरींनी रस्त्यांच्या कामात लोकप्रतिनिधींच्या होणाऱ्या अडचणींचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर रस्त्यांच्या कामात लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून घेत असलेल्या टक्केवारीवरुन वाद चांगलाच रंगला. आता यात शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उडी घेतली आहे. नितीन गडकरी यांनी त्या नेत्याचं नाव सांगावं असे मी त्यांना आवाहन करतो असे म्हणत त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.

चंद्रकांत खैरे म्हणाले की नितीन गडकरी यांनी त्या नेत्याचं नाव जाहीर करावे. मी टक्केवारी संबंधित तक्रार घेऊन नितीन गडकरी यांच्याकडे गेलो होते. तेव्हा मला वाटले की गडकरी हातबल झाले आहेत. त्यांनी मला त्या नेत्याचं नाव सांगितलं, ते त्यांच्याच पक्षातील नाव आहे. मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी देखील याबाबत बोललो, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील मला त्याचं नाव सांगितलं असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

नितीन गडकरी यांनी जे सांगितलं ते खरं आहे. गडकरींच्या मुखातून त्या नेत्याचे नाव सर्वांना ऐकायला मिळावे. मला तर गडकरींनी प्रत्यक्ष त्या नेत्याचे नाव सांगितले आहे. तो नेता प्रचंड भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे रस्त्याची कामे अडून राहिली आहेत. गडकरींनी मला जे सांगितलं ते तुम्ही मिडियाला सांगावे असे आवाहन देखील चंद्रकांत पाटलांनी गडकरींना केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/