५० लाख खंडणीच्या गुन्ह्यात गँगस्टरच्या भावाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बांधकाम व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन करुन धमकावल्याप्रकरणी गँगस्टर एजाज लकडावालाच्या भावाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अकील युसूफ लकडावाला असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हेगारी करवायांसाठी तो भावाच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम उपनगरातील एका बांधकाम व्यावसायिकाला गँगस्टर एजाज लकडावाला डिसेंबर 2018 पासून धमकावत होता. त्यानंतर त्या बांधकाम व्यावसायिकाने आंतरराष्ट्रीय दूरध्वनी उचलणे सोडल्यानंतर 27 फेब्रुवारीला त्यांना स्थानिक व्यक्तीकडून खंडणीसाठी दूरध्वनी करण्यात आला होता.

याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली असता अकीलचा या प्रकरणात हात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अकीलला आज अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.