गौरी गडाख यांची आत्महत्या ? शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

नगरः पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ नेते य़शवंतराव गडाख यांच्या स्नुषा व युवा नेते प्रशांत गडाख याच्या पत्नी गौरी गडाख (Gauri Gadakh) (वय 35) यांचा मृतदेह नगर येथील राहत्या घरात आढळून आला. शनिवारी (दि. 7) सांयकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्येचे कारण उघड होणार आहे. दरम्यान माहेरच्या मंडळीनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

शनिवारी सायंकाळी घटना घडल्यानंतर गौरी यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तत्पूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तपास करून तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आज सकाळी त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे नेण्यात आला. नगर येथील रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदनाची सोय नसल्याने शवविच्छेदन औरंगाबाद येथे करण्याचा निर्णय प्रशासकीय यंत्रणेने घेतला.

गौरी या लोणी (ता. राहता) येथील वसंतराव विखे पाटील यांच्या कन्या होत. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नात्यातील हे कुटुंब आहे. गौरी यांच्या मागे पती सामाजिक कार्यकर्ते व यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख, दोन मुली, असा परिवार आहे. कै. गौरी या राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी होत. या सर्व घटनेनंतर गौरी यांचे पती प्रशांत हे पुण्यातील रुग्णालयात दाखल असल्याचे समजते.