मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर योजने’त काँग्रेसचं ‘गेहलोत सरकार’ नंबर 1, सर्व राज्यांना टाकलं मागे

जयपूर : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत कोरोना संकटकाळात रेशन वितरणात राजस्थान इतर राज्यांना मागे टाकत देशात पहिल्या स्थानावर आले आहे. राजस्थानने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीला देखील मागे टाकले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश मीणा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

रमेश मीणा यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत राज्यात ४४ हजार ६०० मेट्रिक टन गहू, २ हजार २३६ मेट्रिक टन हरभरा वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४२ हजार ४७८ मेट्रिक टन गहू आणि १ हजार ९११ मेट्रिक टन हरभरा वितरित करण्यात आला आहे.

९५ टक्के गव्हाचे वितरण
राज्यात आतापर्यंत आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत ९५.२४ टक्के गहू वाटप करण्यात आला आहे. देशातील इतर राज्यांत उत्तर प्रदेशमध्ये ३.१ टक्के, मध्य प्रदेशात ०.४ टक्के, गुजरातमध्ये ०.१ टक्के, हरियाणामध्ये ३५.७ टक्के, हिमाचल प्रदेशात ४६.९ टक्के, दिल्लीत १५.७ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ६.६ टक्के धान्याचे वितरण केले गेले आहे.

रेशन वितरणात राजस्थानची टक्केवारी उत्तम
मंत्री रमेश मीणा म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत एप्रिल, मे आणि जूनमध्ये एनएफएसएच्या लाभार्थ्यांना गहूचे अतिरिक्त वितरण करण्यात आले आहे. एप्रिल आणि मेमध्ये राज्यात ९८ टक्के रेशन आणि जून महिन्यात आतापर्यंत ९३ टक्के रेशनचे वितरण झाल्याचे त्यांनी सांगितले. अन्य राज्यांच्या तुलनेत रेशन वितरणात राजस्थान आघाडीवर आहे.