रामदास आठवलेंचा सिब्बल, गुलाम नबींना काँग्रेसमधून ‘आझाद’ होण्याचा सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अध्यक्षपदाच्या वादावरून काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असताना रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करा असा सल्ला आठवले यांनी या नाराज ज्येष्ठ नेत्यांना दिला आहे. यामध्ये कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादावर भाष्य केले. काँग्रेसवर आरोप करण्यापेक्षा कपिल सिब्बल आमि गुलाम नबी आझाद यांनी भाजपमध्ये सामिल व्हावं. आम्ही त्यांचे स्वागत करु, असं आठवले यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आता सत्तेत येत राहणार आहे. एनडीए सत्तेतून लवकर बाहेर जाणं कठीण आहे. तसेच भाजपशी हात मिळवणी केल्याचा तुमच्याच नेत्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे. त्यामुळे तुम्ही ज्योतिरादित्य सिंधियांसारखे बंड करा. भाजपमध्ये सामिल व्हा, असा सल्ला रामदास आठवले यांनी या दोन ज्येष्ठ नेत्यांना दिला आहे.

काँग्रेसच्या अध्यपदावरून पक्षातील काही नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते. या वरुन नाराज झालेल्या राहुल गांधी यांनी सिब्बल आमि आझाद यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला आहेत. हाच धागा पकडत आठवले यांनी म्हटले की, सिब्बल आणि आझाद यांना आवाहन करतो की त्यांनी काँग्रेसचा राजीनामा द्यावा. काँग्रेस वाढवण्यासाठी त्यांनी आयुष्याची अनेक वर्षे दिली. आता भाजपमध्ये सामिल व्हावे. तुमचा एवढा अपमान होत असेल तर ज्योतिरादित्य सिंधियांसारखी कणखर भूमिका घ्या. सचिन पायलट यांनीही अशीच कणखर भूमिका घेतली होती. काँग्रेससाठी खस्ता खाणाऱ्या नेत्यांवर राहुल गांधी यांनी आरोप करणं अत्यंत चुकीचं असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.