खुशखबर ! तब्बल 100 दिवसानंतर गोवा 2 जुलैपासून पर्यटकांसाठी खुलं

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी, लवकरच गोव्याचे समुद्र किनारे नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती बंद झालेले २५० हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, येत्या २ जुलैपासून गोव्यात प्रवेश करण्यासाठी पर्यटकांना परवानगी दिली जाणार आहे.

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊन नंतर गोव्यात देशी-परदेशी पर्यटकांना प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत गोव्यातील पर्यटन व्यवसाय सुरु करण्यावर चर्चा झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं आजगावकर यांनी सांगितलं.

आजगावकर म्हणाले, गोव्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने उद्यापासून पर्यटन खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यासाठी काही अटी असणार आहे, पर्यटकांना निगेटिव्ह सर्टिफिकेट सादर करावे लागेल किंवा गोव्यात आल्यानंतर कोरोना संसर्ग टेस्ट करावी लागेल. आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच पर्यटकांना इतरत्र फिरू देण्यात येईल. सध्या गोव्यात पाऊस सुरु झाला आहे. २० मार्चपासून गोव्यात पर्यटन बंद आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचे नुकसान होत होते. अशा स्थितीत स्थानिक व्यावसायिकांनी हॉटेल सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, याला पर्यटकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल.