…तर गोव्यामध्ये एका फोटोसाठी मोजावे लागणार 500 रुपये, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक ठिकाणी फोटो काढण्यास बंदी असल्याचे आपण पाहत असतो. मात्र फोटो काढण्यासाठी टॅक्स घेतला जात असल्याचे आपण कधी ऐकले नसेल. मात्र गोव्यामध्ये एका ठिकाणी अशाप्रकारे फोटो काढण्यासाठी टॅक्स घेतला जातो. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पर्रा या गावामध्ये फोटो काढण्यासाठी टॅक्स घेतला जात आहे. नारळाच्या झाडांसाठी हे गाव लोकप्रिय असून पर्यटकांबरोबरच स्थानिकांना देखील फोटो काढण्यासाठी टॅक्स भरावा लागत आहे. स्वछता टॅक्सच्या नावाखाली पर्यटकांकडून आणि स्थानिकांकडून हे पैसे घेतले जात आहेत.

स्थानिक नागरिक मात्र या निर्णयाचा विरोध करत असून हा टॅक्स लावल्यामुळे पर्यटक याठिकाणी येण्याचे कमी होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पॉल फर्नांडिस या स्थानिक रहिवाशाने तो चित्रित केला होता. याविषयी फर्नांडिस याने सांगितलेल्या माहितीनुसार, त्याच्या एका नातेवाईकांकडून अशाप्रकारे टॅक्स घेतल्यानंतर त्याला याची माहिती मिळाली. एका फोटोसाठी 500 रुपये शुल्क घेणे चुकीचे असल्याचे त्याने म्हटले आहे. देशभरात कुठेही यासाठी कर नसताना गोव्यात अशापद्धतीने कर घेणे चुकीचे असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.

दरम्यान, या गावामध्ये अशापद्धतीने कर घेतल्यास संपूर्ण गोव्यात हि प्रथा लागू होऊन याचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होण्याची भीती देखील त्याने व्यक्त केली आहे.

Visit : Policenama.com