दंगलीतील आरोपीलासुद्धा भाजपकडून उमेदवारी

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरात राज्यात २००२ मध्ये झालेल्या गोध्रा प्रकरणानंतर राज्यात झालेल्या दंगलीतील आरोपी असलेले मितेश पटेल यांना भाजपने आणंद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोळंकी यांच्या विरोधात पटेल लढणार आहेत.

पटेल यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ते गुजरात दंगल प्रकरणातील आरोपी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम १४७ (दंगल), १४६ (दंगल,शस्त्रांचा वापर) कलम ४३६ (जाळपोळ) आदी आरोप आहेत. २००२ मध्ये आणंद जिल्ह्यातील वसाद पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने २०१० मध्ये सोडून दिल्याबाबत राज्य सरकारने २०११ मध्ये त्यांच्या सुटकेविरोधात गुजरात उच्च न्यायालयात अपील केले होते. सध्या हे प्रकरण गुजरात उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

पटेल हे आणंद जिल्ह्यातील मोठे उद्योजक असून लक्ष्मी प्रोटिन प्रॉडक्टस प्रा.लि या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, भाजप पक्षाच्या आणंद शाखेचे विश्वस्त आहेत. त्यांची स्थावर मालमत्ता ३.४८ कोटी तर जंगम मालमत्ता ४.२२ कोटींची आहे.