ठाकरे सरकारची वर्षपूर्ती, राज्यात आजपासून मंगल दिवसाला प्रारंभ : खासदार राऊत

पोलीसनामा ऑनलाइन – महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी अघोरी प्रयत्न केले. पण या सर्वांना पुरून उरून या ठाकरे सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. गेल्या वर्षभरात अनेक संकटांचा सामना करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षपूर्ती केली. पण आता आजपासून महाराष्ट्रासाठी मंगल आणि शुभ दिवस सुरू होतील, असा विश्वास आणि शुभेच्छा खासदार संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी व्यक्त केल्या आहेत.

खासदार राऊत म्हणाले, आगामी चार वर्षे महाराष्ट्राचा विकास, जनतेच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राला मजबूत करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलेल, असे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेतून मला जाणवलं आहे. सर्वांनी मागची संकटं विसरून पुढील चार वर्षे आपण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काम करावे. विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याचे प्रयत्न केले पण सरकारला थोडंही खरचटलं नाही. त्यामुळे विरोधकांनी ही भाषा बंद केली पाहिजे. तसेच महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सरकारला सहकार्य करावे. बाकी निवडणुकीच्या निकालांबाबत आम्ही काय करायचे ते पाहू. महाराष्ट्रातले सरकार पुढील पाच वर्षे स्थिरच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच राहतील, असेही राऊत यावेळी म्हणाले.

किती काळ सीमेवर जवान शहीद होणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करतात ही चांगली बाब आहे. पण मोदींनी हे विसरू नये की नुकतेच पाकिस्तानच्या गोळीबारात आपले जवान शहीद झाले आहेत. यात महाराष्ट्राच्या दोन जवानांचा समावेश होता. अजून किती काळ सीमेवर जवान शहीद होत राहणार ? असा सवालही राऊत यांनी पंतप्रधानांना केला आहे.