‘या’ कंपनीचा कर्मचार्‍यांना मोठा दिलासा ! ना नोकरी जाणार, ना पगार कपात होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. यात अनेकांच्या नोकरी गेल्या आहेत. त्यामुळे यावेळी बेरोजगार होणार्‍यांची संख्येत वाढ झाली आहे. अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत. तर काही कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. मात्र, एअर इंडियाने कर्मचार्‍यांच्या पगारात कोणताही कपात करणार नसल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील चार महिन्यापासून नोकरदार वर्गात सातत्याने वाईट बातमी ऐकणार्‍यांना एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया बोर्ड आणि केंद्रीय वाहतूक नागरी उड्डायाण मंत्रालय यांच्यात झालेल्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील माहिती एअर इंडियाने सोशल मीडियावरून दिली आहे. पगार कपात न करण्याबरोबरच अन्य विमान कंपन्यांप्रमाणे आम्ही कोणालाही नोकरीवरून काढणार नाही, असे ही एअर इंडियाने म्हटले आहे.

आज झालेल्या मंत्रालय आणि एअर इंडिया बोर्डाच्या बैठकीमध्ये कर्मचार्‍यांवर होणार्‍या खर्चाचा आढावा घेतला. बैठकीत अन्य विमान कंपन्यांप्रमाणे कर्मचारी कपात केली जाणार नाही, असे कंपनीने ट्विट करून म्हटले आहे.

एअर इंडियाने दुसर्‍या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या बेसिक पे, डीए आणि एचआरएमध्ये कपात केली जाणार नाही. अर्थात करोना विषाणूमुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे अन्य भत्ते कमी केले जातील.

याचा अर्थ पायलट आणि केबिन क्रू यांना फ्लाइंग आवरच्या हिशोबाने पैसे मिळतील. अन्य भत्त्यातील कपात मात्र सुरू राहिल. जोपर्यंत देशातील आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक करोना विषाणूच्या आधीप्रमाणे सामान्य होत नाही, तोपर्यंत ही कपात सुरू राहिल.

परिस्थिती सामान्य झाल्यावर त्याचा आढावा घेतला जाईल. एअर इंडिया व्यवस्थापनाने कॉकपिट आणि केबिन क्रू यांच्या भत्त्यात 40 टक्के कपात केलीय. ज्यांचा महिन्याचा पगार 25 हजार आहे त्यांच्या पगारात कोणतीही कपात नाही.

मागील आठवड्यामध्ये आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी एअर इंडियाने कर्मचार्‍यांना पाच वर्षासाठी लिव्ह विद आउट पे म्हणजेच विना पगार सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार एअर इंडियातील कर्मचार्‍यांना सहा महिने, दोन वर्ष अथवा पाच वर्ष विना पगार सुट्टीवर पाठवलेही जाऊ शकते.

कर्मचार्‍यांची कामाची क्षमता, मागील सुट्ट्यांचे रेकॉर्ड, कामातील सातत्य आणि कामाचे मूल्य आदी गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतला जाणार आहे. मुख्य कार्यालय आणि स्थानिक कार्यालयातील प्रमुख प्रत्येक कर्मचार्‍यांचे मुल्यांकन करतील. याअगोदर करोनामुळे एअर इंडियाने मार्च महिन्यात कर्मचार्‍यांच्या पगारात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता.

15 ऑगस्टपर्यंत अशा कर्मचार्‍यांची यादी तयार केली जाणार आहे, ज्यांना विनापगार सुट्टीवर पाठवायचे आहे. ज्या कर्मचार्‍यांना विना पगार सुट्टीवर पाठवले जाणार आहे, त्यांना एअर इंडियाच्या परवानगीशिवाय अन्य कोणत्याही विमान सेवा कंपनीत काम करता येणार नाही. ज्या कर्मचार्‍यांना विना पगार सुट्टीवर पाठवले जाणार आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा आणि पास आदी सुविधा कंपनीकडून दिली जाणार आहे.

एअर इंडियाकडे 13 हजारहून अधिक कर्मचारी आहेत. ज्यांच्या पगारावर महिन्याला 230 कोटी इतका खर्च होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींमुळे एअर इंडियाला वेळेवर पगार देता आला नाही.