Good News : पुणेकरांसाठी दुप्पट पाणीसाठा ! मागील 10 वर्षांमध्ये पहिल्यांदाच 3 धरणांमध्ये 10.5 TMC पाणी शिल्लक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागिल पावणेदोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, कंपन्या बंद असल्याने पाण्याचा वापर टळला आहे. तसेच, परतीचा पाऊस आणि मागिल दोन महिन्याचा लॉकडाऊन यामुळे धरणामध्ये मागिल वर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, ही पुणेकरांसाठी गुडन्यूज आहे. साधारण मागिल दहा वर्षांचा आढावा घेतला, तर मे महिन्यात दुप्पट म्हणजे 10.5 टीएमसी (34.34 टक्के) पाणीसाठा असल्याची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी तीन धरणांमध्ये एकूण साठा 10.5 टीएमसी आहे. खडकवासला 1.29, पानशेत 4.66, वरसगाव 4.6 आणि टेमघर एक धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापर्यंत शहर आणि ग्रामीण भागासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील शेतीसाठी आणि शहराला पिण्यासाठी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार प्रमुख धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.

यापैकी टेमघर धरण दुरुस्तीसाठी यापूर्वीच रिकामे करण्यात आले आहे. उर्वरित तीन धरणांमध्ये 10.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

खडकवासला 1.29, पानशेत 4.66, वरसगाव 4.6 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 10 मे रोजी धरणांमध्ये साधारणतः ५ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. मात्र, हा अतिरिक्त पाणीसाठा जलसंपदा विभागाच्या नियोजनापेक्षा ऑक्टोबर महिन्यापर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे आहे. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून उन्हाळ्यात धरणांमधील पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात ग्रामीण भागासाठी दोन सिंचन आवर्तने दिले जातील.

पुणेकरांसाठी पाण्याची गूड न्यूज

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन धरणांमध्ये सध्या 10.5 टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील चार किंवा साडेचार टीएमसी पाणी सिंचन आवर्तनासाठी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाला सोडण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. महापालिकेला प्रतिमहिना १.२५ टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीगळती, पाणीचोरी आणि पाऊस लांबल्यास नियोजनानुसार काही पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. या बाबी लक्षात घेतल्या तरीदेखील पाऊस सुरू होईपर्यंत धरणांमध्ये अडीच ते तीन टीएमसीपर्यंत पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी लांबलेला पाऊस यंदा पथ्यावर पडला असून, पुणेकरांसाठी सध्या मुबलक पाणी उपलब्ध आहे.

मागिल वर्षी पिण्याच्या पाण्यात काहीशी कपात करावी लागली होती. मात्र, पावसाळ्यामध्ये चारही धरणे वेळेत भरली होती. त्यानंतर पुन्हा परतीच्या पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही. आता उन्हाळी पहिले आवर्तन सुरू आहे. आजच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कुठल्याही तक्रारी नाहीत. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत पाणी कपात करण्याची वेळ येणार नाही. शेती आणि पिण्यासाठीच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले आहे. या निर्णयामुळे पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी खूपच कमी झाल्या. यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत कोणत्याही तक्रारी आल्याच नाहीत. सध्या पुरेसा पाणीसाठा असून, तो जुलैअखेरपर्यंत व्यवस्थित पुरेल एवढा आहे. पावसाळा उशिरा सुरू झालाच तर वेगळे नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे, असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात चार धरणापैकी तीन धरणामध्ये 10.5 टीएमसी पाणीसाठा आहे. यावर्षी योग्य नियोजन आणि परतीच्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणीसाठा आहे. आजच्या परिस्थितीत पावसाळ्यापर्यंत पाणी कपात करावी लागणार नाही, एवढा पाणीसाठा धरणांमध्ये आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.