Video : लवकरच चांगले घडेल, फडणवीसांना शुभेच्छा देत उदयनराजेंनी केलं ‘सूचक’ विधान

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी बुधवारी भाजपच्या (BJP) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणाचे चित्र पालटण्याची चिन्ह आहेत. त्यातच राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosle) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devevdra fadanvis) यांना शुभेच्छा देत, लवकरच चांगले घडले, असे सूचक विधान केले आहे.

 

 

 

परतीच्या पावसाने सातारा जिल्ह्यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदयनराजे भोसले हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहेत. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज्याची सूत्र ताब्यात घेऊन एक चांगल्या प्रकारच शासन महाराष्ट्रात लागू करण्याकरिता देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना शुभेच्छा देतो, असं म्हणत त्यांनी आगामी काळात राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या. पण राजकारणामुळे त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. सरकार कोणाचे पण असू द्या, पण स्थिरता असेल तरच शासन करु शकतो, असेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, लवकरच काही तरी चांगले घडेल आणि लोकांची जी काही प्रश्न आहेत, ती सुटणार आहेत, असे सूचक विधान उदयनराजे यांनी केलं आहे. त्याचबरोबर काही लोकं ही आपल्या स्वार्थासाठी एकत्र आली आहेत. स्वार्थासाठी जी लोकं एकत्र येतात तेव्हा निर्णय होत नाही. स्वार्थ पूर्ण झाला की लोकं वेगळे होतात, असा टोलाही उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

You might also like