मंदिरात चप्पल घालून गेल्याच्या कारणावरून दोन गटांत ‘राडा’; आ. पडळकरांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे सोमवारी (दि. 16) भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. अशातच मंदिरात चप्पल घालून गेल्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. सांगली जिल्ह्यातील मासाळवाडी (ता. आटपाडी) येथे ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही गटांतील 12 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांचाही समावेश आहे.

याबाबतची माहिती अशी की, मासाळवाडी गावातील मंदिरात काही जण चप्पल घालून आले होते. त्यावेळी त्यांना मंदिरात चप्पल का घालून आला, अशी विचारणा केली असता, दोन गटांत वाद होऊन त्याचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. यावेळी दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, ब्रह्मानंद पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.