‘राज्याच्या राजकारणात येणार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी काळात राजकारणात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ही संघटना उदयाला येणार आहे अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. आज गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजप सोडणार नाही तसेच कोणतंही पद न घेता समांतर यंत्रणा उभी करण्याचा इरादा असल्याचं पंकजांनी बोलून दाखवलं.

पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं की, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणे त्यांनाही संघर्ष करायचा आहे. पक्ष सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 2014 मध्ये ज्याप्रमाणे संघर्ष यात्रा काढण्यात आली होती तशीच यात्रा आता पुन्हा काढणार असून राज्यातील दीन दुबळ्या, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू करणार असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी यावेळी केली. तसेच मला भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

माझ्याकडे आता कोणतंही पद नाही, मी साधी आमदारही नाही. आमदारकी, खासदारकी, विरोधी पक्षनेतेपद अस काहीही माझ्याकडे नाही मी आता जनतेसाठी काम करणार आहे असंही त्यांनी सांगितलं. मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता पंकजा मुंडेंसोबत भाजप असेल किंवा नसेल हेही समोर आलेलं नसलं तरी राज्याच्या राजकारणात मात्र गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान असणार हे मात्र नक्की.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/