कर्नाटक : सरकारी कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यास मिळणार 30 लाख रुपये भरपाई

बेळगाव : वृत्तसंस्था – कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना 30 लाख रुपये भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यास सर्व वैद्यकीय उपचार शासकीय खर्चातून केले जाणार आहेत. राज्याच्या अर्थ खात्याचे विशेष सचिव पुरुषोत्तम सिंग यांनी याबाबतचा आदेश शुक्रवारी (दि.7) काढला आहे. त्यामुळे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोरोनामुळे धास्तावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. कर्नाटकामध्ये मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा काम करत आहे.

लॉकडाऊन काळात कोरोनाचा संसर्ग कमी होता. त्यावेळी कोरोनाची बाधा झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला. कोरोनासाठी नियुक्त केलेल्या राज्यातील विविध भागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊ लागली. जून आणि जुलै मध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाकडून किती आर्थिक मदत द्यावी हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे शासकीय कर्मचारी संघटनांनी मृतांच्या कुटुंबीयांना 30 लाख रुपये तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यास मोफत वैद्यकीय उपचार करण्याची मागणी केली होती.

राज्य शासनानेही भरपाई व मोफत वैद्यकीय उपचाराबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला अर्थ खात्याची आवश्यकता होती. अर्थ विभागाने तो प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना 30 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे. याशिवाय कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्यास त्याच्यावर वैद्यकीय उपचार मोफत केले जाणार आहेत. याचा फायदा मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे.