CM ठाकरेंच्या आमदारकीचा पेच : विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याची राज्यपालांची ‘विनंती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत सस्पेन्स निर्माण झाला असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका व्हाव्यात म्हणून हालचाली सुरु केल्या आहेत. राज्य विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त असून या जागांची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर करावी अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांनी आयोगाकडे केली आहे. 24 एप्रिल रोजी परिषदेच्या 9 जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी निवडणूक घ्यावी, असे राज्यपालांनी आयोगाला सांगितले आहे.

राज्यपालांनी याबाबत एक पत्र आयोगाला पाठवल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्याने यात शिथिलता आणून सवलती देण्यात येत आहे. ही बाब ध्यानात घेता निवडणूक आयोग नियमांच्या चौकटीत राहून निवडणूका घेऊ शकतो, असे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यात सदस्य होणे गरजेचे आहे. मात्र देशात कोरोनामुळे विधान परिषदेच्या निवडणूका लांबणीवर पडल्या.

यामुळे राज्यपालांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करावी यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे शिफारस केली होती. मात्र, राज्यपालांनी यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली विनंती फार महत्तवाची ठरली आहे.