विद्यापीठाच्या परीक्षांबाबत लवकर निर्णय घेण्याचे राज्यपालांचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे रखडलेल्या विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसताना केलेल्या हस्तक्षेपाबाबत उच्चशिक्षणमंत्र्यांना समज द्यावी, असेही कोश्यारी यांनी म्हटले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने फक्त अंतिम वर्षांच्याच परीक्षा घेण्याचा पर्याय दिल्यानंतर राज्यातील कुलगुरू आणि अधिकार्‍यांच्या समितीनेही अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यानुसार विद्यापीठांनी जुलैमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची तयारीही सुरू केली. मात्र, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी भूमिका घेतली. त्या अनुषंगाने आयोगाला पत्रा लिहून आयोगाचा निर्णय न आल्यास राज्याच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही जाहीर केले.

या सर्व प्रकारावर राज्यातील विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. ‘विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अधिक वेळ न घालवता अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा प्रश्न सोडवावा. परीक्षा न घेणे हा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि विद्यापीठ कायद्याचा भंग आहे,’ असे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. ‘विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा आणि त्यांना पदवी देण्याचा अधिकार विद्यापीठांना आहे. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पदव्या देणे हे अनैतिक आहे. विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण, नोकरीच्या संधी यांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो’ असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.