आजोबा….आता रिटायर व्हाच !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – (मल्हार जयकर) – ‘आ ई रिटायर होते’ असं एक नाटक काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर खूप चाललं होतं. भक्तीचा हा प्रभाव होता. म्हणजे भक्ती बर्वे आणि मराठी माणसाची मातृभक्ती. ‘नाटक छान होतं. खूप खूप रडायला येतं,’ असं कौतुकानं सांगणारा उदंड प्रेक्षक असल्यावर कुठलीही आई थोडंफार यश पदरात बांधून घेणारच! या ‘आई रिटायर होते’ नाटकावर मला काही लिहायचं नाही, पण एक आजोबा आता रिटायर का होत नाहीत? असा प्रश्न मला पडलाय. बरंच कर्तृत्व गाजवून झालंय, मुलं विविध क्षेत्रात नावांजलीत, आपल्या विचारानं आचार करू लागली. परिवार चांगला फळफळला, पण आजोबांना स्वस्थ बसवत नाही. आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रम सांगितलाय. आजोबा मात्र उगाचच बाळसं आल्यासारखं दाखवत मुलांच्याच पायात लुडबुड करत आहेत. वयोपरत्वे आजोबांचे काही निर्णय चुकताहेत असं दिसून येतंय. ज्यांनी आजोबांच्या कुटुंबाला आपलं मानलं, त्यांच्या वाढविस्ताराला हातभार लावला त्या कौटुंबिक संबंधाची जाणीव न ठेवता आजोबांनी त्या कुटुंबातील नातवांना दूर लोटलंय! याने केवळ या घराण्यांचंच नव्हे तर राजकीय पक्षाचं, वैचारिक बांधिलकीचं आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचं खूप मोठं नुकसान झालंय. मात्र आजोबांना त्याची जाणीव झालेली नाही. त्यामुळं आता आजोबांना सांगावं लागतं.. आजोबा, बस्स झालं….आता रिटायर व्हाच…!!

नातवांना जातीयवाद्यांचे भोई व्हावं लागलं’
जातीयवादी गिधाडं गावाच्या वेशीबाहेरच अडवा…. त्यांना गावात येऊ देऊ नका!’ असा पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ज्यांनी रुजवला त्या आजोबांनीच आता आपल्या निर्णयांनी नातवांवर त्या ‘जातीयवादी गिधाडां’च्या पालखीचे भोई होण्याची वेळ आणलीय. महाराष्ट्राच्या राजकारणात वजनदार अशा विखेपाटील आणि मोहितेपाटील घराण्यातील नातवांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. याला कारणीभूत ठरले आहेत ते आजोबा शरद पवारसाहेब…!

विखेपाटील नातवासमोर अडचणी उभ्या केल्या
नगर जिल्ह्याचे बाळासाहेब विखेपाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे शंकरराव मोहितेपाटील या घराण्यांचे बारामतीच्या शरद पवार घराण्याचे अत्यंत घरोब्याचे संबंध होते. शरदरावांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार हे प्रारंभी विखेपाटीलं यांच्या साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यावेळी शरदराव यांचं तिकडे सतत येणं जाणं होतं. त्यामुळे बाळासाहेब विखेपाटीलांशी त्यांचे प्रारंभीच्या काळात मैत्रीचे, सलोख्याचे संबंध होते. वैचारिक जडणघडण सारखीच होती. जातीयवादी विचारांना त्यांचा विरोध होता. पण नंतरच्या काळात राजकीय महत्वाकांक्षी स्वभावाने ते संबंध दुरावले. नंतर ते टोकाचे बनले! दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात शरदआजोबांनी घेतलेल्या निर्णयाने अखेर विखेपाटीलांच्या नातवाला डॉ. सुजयला भाजपनं आपल्याकडं ओढलं.

मोहितेपाटील नातवाची गोची केली 
सोलापूर जिल्ह्याच्या मोहितेपाटील घराण्याशीही पवारांचे आत्मीयतेचे संबंध होते. शंकरराव मोहितेपाटील यांच्या साखर कारखान्यातही काही काळ आप्पासाहेब पवार हे व्यवस्थापकीय संचालक होते. शिवाय बारामतीपासून अकलूज खूपच जवळ असल्यानं शरदरावांचं तिथं अनेकदा जात येत, त्यातूनच विजयसिंह मोहितेपाटील यांच्याशी मैत्रीही झालेली. शंकरराव मोहितेपाटील यांचे संघाच्या लोकांशी संपर्क होता पण त्यांनी कधी त्यांना अकलूजमध्ये थारा दिलेला नव्हता. पण शरदआजोबांच्या निर्णयामुळे त्यांच्याही नातवाला रणजितसिंहाला भाजपेयीं व्हावं लागलं.

नवख्या पार्थला मतदारांसमोर उभं केलं
आजोबांनी मावळ मतदारसंघातही असाच घोळ घातला. आपला नातू पार्थ याला आधीपासूनच तयारी करायला सांगितली. नंतर मात्र आपण स्वतः माढा मतदारसंघातुन उभं राहणार असल्यानं पवार कुटुंबातून केवळ एकच जण उभं राहिलं असं सांगत पार्थला उमेदवारी नाकारली. पण अजित पवारांनी पार्थची उमेदवारी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला अखेर नाईलाजानं त्यांनाच निवडणुकीतून माघार घ्यावी लागली अन पार्थला उमेदवारी देण्याची नामुष्की ओढवली. शरदआजोबांच्या या चुकलेल्या निर्णयानं सुजय आणि रणजितसिंह यांना भाजपला जवळ करावं लागलं. तर पार्थसारख्या नवख्या नातवाला निवडणुकीच्या राजकारणात ढकलावं लागलं.

चुकीच्या निर्णयानं भाजपला पायघड्या
शरद पवारांवर त्यांची आई शारदाबाई पवार यांचे संस्कार झालेले आहेत. त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांची विचारसरणी ही पुरोगामी होती. मूल्याधिष्ठित राजकारण हे शारदाबाई पवारांचं जीवनध्येय होतं. हे सारं पाहूनच शरद पवार घडले. महाराष्ट्र हा शरद पवारांकडे पुरोगामी नेता म्हणूनच ओळखतो. त्यामुळंच महाराष्ट्रातला तरुण त्यांच्याकडे आकर्षिला गेला. रा.स्व.संघाचं मुख्यकेंद्र महाराष्ट्रात असलं तरी महाराष्ट्रात तो विचार फारसा रुजला नाही. पण सध्या त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून होताना दिसतोय. त्यांच्या सध्याच्या काही निर्णयामुळे राज्यातल्या अनेकांना भाजपेयीं होण्यास भाग पाडले गेले आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेकांनी जातीयवादी विचार स्वीकारला. आता या नातवांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तो आजोबांच्या चुकीच्या निर्णयामुळे! तेव्हा आजोबा, आता आपलं राजकारण बस्स झालं…. आता रिटायर व्हा…!!