नागरिकांच्या हातात बंदुकी देण्याचा पोलिसांनीच घेतला निर्णय !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी त्यांना चक्क बंदूक परवाना देण्याचा लोकाभिमुख निर्णय नवनियुक्त आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला आहे. परंतु कृष्ण प्रकाश यांच्या या निर्णयामुळं पिंपरी पोलीस दलाची दुबळी बाजू उघडी पडल्याची टीका होऊ लागली आहे.

दगडांनी ठेचून खून करणारे, हातात शस्त्र घेऊन फिरणारे गुंड, वाहनांची तोडफोड करणारे गुंड, सराफा दुकान फोडणारे, एटीएम मशीन उखडून नेणारे आणि इतकंच नाही तर कोरोनाची लागण होऊ नये यासाठी पीपीई किटी घालून कुणाचीही भीती न बाळगता चोरी करणारे चोर अशा घटनांनी पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीचा क्रूर चेहरा लॉकडाऊननंतर समोर आला आहे.

आता लोकांच्या हातात शस्त्र देऊन अशी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठीचा अजब प्रयोग पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश करू पहात आहेत. विशेष म्हणजे नागरिकांनीही या प्रयोगाचं स्वागत केलं आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता नागरिकांना बंदूक परवाना देण्याचा निर्णय कृष्ण प्रकाश यांनी घेतला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 30 लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केवळ 3800 पोलिसांच्या खांद्यावर आहे. अर्थातच पोलीस कर्मचारी कमी असल्यानं शहरातील गुन्हेगार मोकाट आहेत. मात्र म्हणून नागरिकांच्या हाती शस्त्र देण्याचा हा प्रयोग पुन्हा टोळी संस्कृतीकडे नेणारा प्रकार असल्याची टीका माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केली आहे.

पिंपरीतील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना आतापर्यंत अपयश आलं हे तर स्पष्टच आहे. तेव्हा कृष्ण प्रकाश यांचा हा प्रयोग किती यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.