पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची सुपारी मागणारा गजाआड

जयपुर : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची सुपारी मागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई राजस्थान पोलिसांनी केली. या व्यक्तीने फेसबुक या सोशल मीडियाच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची सुपारी मागितली होती. आरोपीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीने आपल्या फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खून करण्याची सुपारी देण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध घेऊन अटक केली.

नवीन यादव (वय-३१ रा. त्रिवेणीनगर, रेवाडी, हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नियंत्रण कक्षात तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करुन नवीन यादव याला अटक केली आहे.

नियंत्रण कक्षाला मिळालेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने नवीन यादव याचा शोध घेऊन अटक केली. नवीन यादव याने २६ मार्चला फेसबुकवर ‘नरेंद्र मोदी यांचा खून करण्याची सुपारी कोण देईल का, मोदी यांचा खून करण्यासाठी माझी पूर्ण तयारी झाली आहे’ अशी पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही पोस्ट टाकल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर त्याने ही पोस्ट फेसबुक पेजवरुन काढून टाकली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कामांमुळे मी नाराज आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात राग असल्याने मी ती पोस्ट फेसबुकवर टाकल्याचे नवीन यादव याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नवीन यादव याच्यावर देशद्रोह, सार्वजनीक शांततेचा भंग आणि धमकी दिल्याचे गुन्हे दाखल करुन अटक केली आहे.