रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवधर्न जाधवांचा राजकीय ‘संन्यास’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते आणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मोठी घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी राजकिय संन्यास घेतला असल्याची जाहीर केले आहे. हर्षवर्धन यांनी स्वत: सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. हर्षवर्धन यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका व्हिडिओ संदेश जारी करून त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. नुकतंच त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता.

निवृत्तीची घोषणा करताना ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अनेकजण आपापले छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला आहे. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला त्यातून झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असे जाधव यांनी म्हटलं आहे.

याबाबत आपले जे काही प्रश्न असतील ते आपण संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात झाल्या पण याचा अर्थ असा नाही की काही वेगळ्या गोष्टी घटत असतील. मी संजना यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायबान जाधव यांच्या आशिर्वादाने आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्त्वात त्या निश्चित उत्तुंग भरारी मारील, असेही जाधव यांनी म्हटले आहे. तसेच आपण सर्वांनी इथून पुढं राजकीय, सामाजिक किंवा शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क करावा.

मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा, असे देखील हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. एका नव्या डॅशिंग भूमिकेत हर्षवर्धन जाधव दिसले. गेल्या काही वर्षामध्ये मी थोडा भरकटलो होतो, काही गैरसमज झाले होते, यातून आता माझी घरवापसी झाली आहे, असे ते म्हणाले होते.