हवेली : कदमवाकवस्ती येथे भाजीपाला खरेदीसाठी उसळली गर्दी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हवेली तालु्क्यातील कदमवाकवस्ती (लोणी काळभोर) येथे भाजीपाल्याचे टेम्पो थांबल्यानंतर नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नका, असे वारंवार सांगितले जात असले तरी खरेदीसाठीची गर्दी पाहता नागरिकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन केले आहे. भाजीपाला, दूध, जीवनावश्यक वस्तू त्यामधून वगळल्या आहेत. मात्र, जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे आता जीवघेण्या ठरत आहेत. गर्दी करू नका, घराबाहेर पडू नका, असे सांगत असताना एकाच ठिकाणी भाजीपाला ठेवल्यामुळे गर्दी होत असल्याने ही परिस्थिती जीवघेणी ठरत आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांपेक्षा दलालांनीच मोठी दुकाने थाटली आहेत. भाजीपाला विकण्याच्या नावाखाली भाजीवाले, शेतकरी पूर्ण शहरात फेरफटका मारून येत आहेत. तसेच, स्थानिक दुकानदार माल उपलब्ध असूनही तुटवडा दाखवत आहेत. कवडीपाट टोलनाक्यावर भाजीपाल्याचे टेम्पो उभे करून विक्री केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे. पोलीस प्रशासन, सिनेकलाकार विविध माध्यमांच्या साहाय्याने घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहेत. मात्र काही मंडळी मुद्दाम गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी स्वतःबरोबर कुटुंबीयांच्या स्वास्थ्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या भीतीने नागरिक मिळेल त्या किमतीला वस्तू खरेदी करत आहेत, त्याचाच फायदा दुकानदार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.