COVID-19 प्रमाणे प्राणघातक सिद्ध होऊ शकतो ‘अज्ञात न्यूमोनिया’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करत असताना आता चीनकडून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. चीनच्या कझाकस्तानमध्ये ‘अज्ञात न्यूमोनिया’च्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे, चीनने कझाकस्तानमध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना याबाबत सूचना दिली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापेक्षा जास्त प्राणघातक असल्याचे चीनने ‘अज्ञात न्यूमोनिया’विरूद्ध सतर्क केले आहे.

कझाकस्तानमधील चीनच्या दूतावासाने व्युचॅट प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी केले आहे की, यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात कझाकस्तानमध्ये १,७७२ लोकांचा मृत्यू अज्ञात न्यूमोनियामुळे झाला आहे, ज्यात केवळ जूनमध्ये ६२८ लोक मारले गेले आहेत.

मृतांमध्ये चिनी नागरिकही असल्याचे त्यात म्हटले आहे. सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने शुक्रवारी दूतावासाच्या निवेदनाच्या हवाल्यातून सांगितले की, कोविड-१९ आजारापेक्षा या आजाराने मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे.

दूतावासाने म्हटले की, कझाकस्तानच्या आरोग्य विभागासह अनेक संस्था न्यूमोनिया या विषाणूचा अभ्यास करत आहेत. हा आजार कोविड-१९ शी संबंधित आहे की नाही याबद्दल मात्र काही माहिती नाही. हा न्यूमोनिया चीनमध्ये पसरू नये यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे काही चिनी तज्ञांचे मत आहे. कझाकस्तानची सीमा चीनच्या वायव्य झिनजियांग उइगुर स्वायत्त प्रदेशाला लागून आहे. दूतावास कझाकस्तानमधील नागरिकांना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पावले उचलण्यास जागरूक करत आहे. अहवालात कझाकस्तानच्या मीडियामधील त्या बातमीचा संदर्भ देण्यात आला आहे, ज्यात कझाकस्तानचे आरोग्यमंत्री म्हटले होते की न्यूमोनियामुळे आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या कोविड-१९ मुळे आजारी पडलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा दोन किंवा तीन पट जास्त आहे.