आरोग्य मंत्रालयानं शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे, हॉटेल आणि कार्यालयासांठी जारी केली नवीन ‘नियमावली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील वाढत्या कोरोना विषाणू दरम्यान जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून देशव्यापी लॉकडाऊन कठोर मार्गदर्शक सूचनांसह शिथिल करण्यात आले. लॉकडाऊन दरम्यान देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, अनलॉक 1 च्या पहिल्या टप्प्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामध्ये देखील धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट्स आणि कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली. त्यांना उघडण्यास परवानगी देताना केंद्र सरकारने या सार्वजनिक जागांसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. शुक्रवारी (दि.12) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट्स, कार्यालयामध्ये खबरदारी घेण्याच्या अनेक मार्गदर्शक सूचना पुन्हा जारी केल्या आहेत. ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे सर्वांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत.

शॉपिंग मॉलसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे
आरोग्य मंत्रालयाच्या जारी करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार शॉपिंग मॉल्समध्ये उच्च जोखमी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी फ्रन्ट लाईन काम टाळणे आवश्यक आहे. वस्तू देताना सावधगिरी बाळगणे आणि कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. दुकाने/कॅफे आणि लिफ्टमध्ये आणि बाहेर सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. गेमिंग क्षेत्र/सिनेमा हॉल बंदच राहतील. मॉलमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी 6 फूट अंतर आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, मॉलमधील प्रत्येकास मास्क घालणे बंधनकारक असेल. थुंकण्यावर पूर्णपणे बंदी असेल. मॉलच्या गेटवरही सॅनिटायझर ठेवणे आवश्यक असेल. यासह प्रवेशाच्या वेळी थर्मल स्क्रिनिंगची देखील व्यवस्था करावी लागेल.

धार्मिक स्थळांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे
धार्मिक स्थळांसाठी जारी केलेल्या या नवीन मार्गदर्शक सुचनांमध्ये असे म्हटले आहे की, भाविकांसाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर जाण्याचे दरवाजे असावेत. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क असेल तरच त्यांच्या प्रवेशास परवानगी दिली जावी. याशिवाय प्रतिबंधित भागातील धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंदच राहतील. परंतु प्रतिंबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे उघडली जाऊ शकतात. या व्यतिरिक्त, त्यांना दिलेल्या इतर मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे लागेल.

हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे
शॉपिंग मॉल्स आणि धार्मिक स्थळाप्रमाणेच हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी देखील आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यामध्ये सामाजिक अंतराचे व्यवस्थापन करणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असेल. हॉटेल्सना दिलेल्या सचनांनुसार परिसराच्या आत व बाहेर पार्किंगमध्ये गर्दीचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. वॉशरुमची स्वच्छता सुनिश्चित केली पाहिजे.