जोरदार पावसामुळे पीएमपी बसवर झाड कोसळले, चालक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून सायंकाळी सहाच्या सुमारास शहर आणि परिसरात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. शहरातील विविध भागामध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. टिळक रोड परिसरात ग्राहक पेठे समोरून जात असलेल्या एका पीएमपीबसवर मोठे वडाचे झाड कोसळले. यामध्ये बस चालक जखमी झाला असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सायंकाळी सहाच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग निर्माण झाले होते. त्यानंतर सातच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बाजीराव रोडवरील सरस्वती विद्या मंदीर मैदानावर होणारी राज ठाकरे यांची देखील सभा रद्द करावी लागली. तर टिळकर रोडवर बसवर झाड पडल्याने बसमध्ये दोन प्रवाशी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसमधून प्रवाशांची सुटका केली असून झाड हटवण्याचे काम सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साठून वाहतूक कोंडी झाली. अचानक झालेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. पुढील तीन ते चार दिवस शहर आणि परिसरात दुपारनंतर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेध शाळेने वर्तवला आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाबरोबरच काही ठिकाणी गारा पडल्या. बाजीराव रस्ता, आप्पा बंळवंत चौक, शनिवार वाडा, नारायण पेठ या ठिकाणी गारा पडल्याचे वृत्त आहे.

पुण्यावर १५ किलोमीटर उंचीचे जास्त घनतेचे ढग असून कमी वेळात जास्त पाऊस शक्य असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत व पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com 

You might also like