नायगाव तालुक्याला पावसाने प्रचंड झोडपले, तोंडावर आलेली पिके गेली

नायगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आठवड्याच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट करीत धो-धो पावसाने गुरुवारी संध्याकाळी दोन तास १५१ मिलीमीटर पाऊस पडत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे हाता तोंडाला आलेले सोयाबीन व कापूससह अन्य पिकांचे आतोनात नुकसान करून होत्याचे नव्हते केले असल्याने दीपावली सणावर सावट पसरले आहे.
naygaon
यंदाचे पीक अगदीच जोमात असल्याने शेतकरी कष्टकरी मोठ्या आनंदात असताना आठ दिवसाच्या विश्रांती नंतर एका दोन तासात पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला आहे. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नायगाव वाडी व नरसी येथे दोन ठिकाणी विज पडली. लालवंडी येथे तीन घरे पडली आहेत. तर नरसी, नायगाव शहरातील अनेक गल्लीत नागरिकांच्या गुडघ्याएवढे पाणी साचले होते. काढणीला आलेले हजारो हेक्टर मधील सोयाबीनची मोठी दुर्दशा झाली असून कापलेली सोयाबीन अक्षरशः पाण्यात तरंगत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर रात्र भर विजही गुल झाली होती.

तालुक्यातील धुप्पा, भोपाळा, टाकळी, शेळगाव, कुंचेली, मरवाळी, माजरंम, पळसगाव, ताकबीड, कोलंबी धानोरा, हिप्परगा माळ, गडगा , कहाळा, नरसी भागात मेघ गर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह सलग दोन तास पडलेल्या पावसाने सोयाबीन, कापुस, ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाले. पाण्यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असताना त्याची दखल घ्यायला कोणीच तयार नाही कारण राज्यकर्ते आणि प्रशासनाची यंत्रना निवडणुकीत गुंतलेली असतांना शेतकऱ्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे.
येथील प्रसिद्ध असलेल्या बालाजी मंदिरात पाणी शिरल्याने मंदिराच्या गाभाऱ्यात पाच फुट पाणी साचून येथील खोल्यांत पाणी शिरल्याने खोल्यामधील तांदूळ, गहू आदि साहित्य भिजून गेले तर मुखेड रोडवरील मानारच्या कालव्यात चौकातील पाणी जाऊन मोठे भगदाड पडले.
Naygaon
ताकबिड येथे देवीदास माधवराव टेकाळे यांचे राहते घर पडून मोठे नुकसान झाले व गुरूवारी रात्रभर व शुक्रवारी दिवसभर विद्युत पुरवठा बंद होता अशी माहिती सरपंच शिवराज पा. वरवठे यांनी दिली. तर येथील एका मोबाईल टावरवर विज पडल्याची माहीती माधव कोरे यांनी दिली. तर नायगाववाडी येथील शेतकरी रामचंद्र जुबरे यांच्या बैलावर विज पडल्याने अंदाजे ८० हजाराचा बैल ठार झाल्याची माहिती नायब तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी दिली. गुरूवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी नाल्याच्या आजूबाजूच्या शेतात पाणी शिरल्याने अनेक शेतातील पिके व माती खरडून गेले तर शुक्रवारी अनेक शेतात पाणीच पाणी दिसुन येत होते. गुरूवारी झालेल्या या पावसाने शेतातील सोयाबीन, कापूस, ज्वारीचे, मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यासमोर संकट उभे ठाकले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत नरसी चौकात कधी येवढे पाणी वाहिले नाही असी प्रतिक्रिया शेख अयुब भाई व समिर फुलवाले यांनी दिली. तसेच नायगाव शहरातील बोमनाळे गल्ली व जुन्या नायगावातील अनेक घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे कळते. सध्या महसुल खाते व अन्य खात्याचे अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत.

शहरात प्रचंड नासधूस झाली आहे, शेकडो झाडे कोलमंडून पडली. मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा मुकाबला करणारा शेतकरी या वर्षीचा खरीप हंगाम दमदार असल्याने मोठ्या आनंदात होते. पण तो आनंद क्षणिक ठरला. शासनाने वेळीच पुढाकार घेऊन सदरील पिकांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पंकजा मुंडे यांचा उमरी येथे जाहीर सभा झाली पण त्यांनी ह्याकडे कुठेही विचारणा केली नसावी अशी चर्चा नायगाव मध्ये सुरू आहे.

Visit : Policenama.com