मुंबई आणि ठाण्यात WeekEnd ला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हवामान विभागाकडून मुंबई- ठाण्यासह उपनगर आणि पालघर परिसरात १३ आणि १४ जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवरती गेला होता. केरळात मान्सून चे आगमन वेळेत झाले असले तरी महाराष्ट्रात मात्र येण्यास विलंब झाला आहे.

राज्यात कोकण किनारपट्टीवरती सर्वप्रथम मान्सूनचं आगमन होईल. गेले दोन तीन दिवस तळकोकणात आणि गोव्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. बुधवारी दक्षिण किनारपट्टी भागात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यप यांनी दिली. तर येत्या दोन तीन दिवसांमध्ये राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुंबई-ठाण्यासह उपनगरात आणि पालघरमध्ये १३ आणि १४ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पहिल्या टप्प्यात पावसाचा जोर राहणार आहे.

मान्सूनच्या आगमनासाठी पूरक वातावरण निर्माण झाल्यानं मान्सून येत्या ४८ ते ७२ तासांत दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल मंदावली होती. ती आता पुन्हा जोमाने सुरु झाली आहे. केरळात वेळेवरती पोहचलेला मान्सून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे कर्नाटकात अडकला होता.