विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात पुन्हा मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा ‘इशारा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बंगालच्या उपसागरात आंध्र किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणासह महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. विदर्भासह मराठवाड्यात सर्वदूर पावसाचे अंदाज असून अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी बुधवारी व गुरुवारी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील परभणी येथे काल सायंकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. नागपूर येथे मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा जोर आहे.

बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा शक्यता असून सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी १९ सप्टेंबरला मुंबई, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, परभणी बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सध्या सुरु असलेला हा पाऊस २१ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या मराठवाडा वगळता राज्यातील जवळपास सर्व धरणे तुंडुब भरुन वाहत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला तर पुन्हा नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, कोकणात आता ज्यांचा विचार करत असाल तर अगोदर तेथील पावसाची काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन मगच प्रवासाचा बेत आखा.