राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील काही भागांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबई शहरात काही भागात मध्यम ते हलका स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, रायगड जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. गेले काही दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. घाटमाथ्यावर काही भागात अधूनमधून पाऊस हजेरी लावत होता पण राज्यात मुसळधार पाऊस थांबला होता. आता पुढील 24 तासांत विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने स्थानिक यंत्रणादेखील सतर्क झाली आहे.

नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाने सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणे भरून वाहू लागतात. सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचे संकट दिसू लागले होते. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. काही आठवड्यांआधी झालेल्या पावसाची सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील बहुतांश धरणे वाहू लागली आहेत.