राज्यात आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढणार, वेधशाळेचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी (दि.12) पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 24 तासात मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारामध्ये पुढील24 तासात काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मात्र, जुलै महिन्यात कोकण आणि महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असंही कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई आणि उपनगर भागामध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. काही उपनगर भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुंबई, नवी मुंबई, कोकण किनारपट्टी, महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. देशातील बहुतांश भागातही पावसाला सुरुवात झाली आहे.

पुण्यात मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, खडकवासला धरण साखळीतील चारही धरण भरलेली असल्यामुळे मुठा नदीमध्ये विसर्ग सुरु आहे. तर दुसरीकडे, कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या तीन चार दिवासांपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.