पूर्व हवेलीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, शेतकर्‍यांचे नुकसान

थेऊर : गेली अनेक दिवसापासून दडी देऊन बसलेल्या पावसाने रविवारी रात्री जोरदार बॅटींग केली त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली तर शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

हवेलीच्या पूर्व भागातील बहुतेक सर्वच गावामध्ये काल रविवारी रात्री मेघगर्जेसह वादळी पाऊस पडला त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. गेली अनेक दिवस पावसाने उघडीप दिली होती सध्या उष्णता वाढल्याने घामाच्या धारा वाहत होत्या अशावेळी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आकाशात काळेभोर ढग जमा जोरजोरात ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाटात मुसळधार पाऊस पडला.

या पावसामुळे काढणी योग्य पिकांचे मोठे नुकसान झाले यात बाजरी पिकाला मोठा फटका बसला.अनेक शेतकर्यांनी बाजरी काढनीला सुरुवात केली आहे तर काही शेतात उभ्या आहेत वार्यामुळे हे पिक जमीनदोस्त झाले आहे. ओढे नाले भरुन वाहू लागले आहेत.अनेकांच्या घरातही पाणी शिरले असल्याचे समजते.

हवामान खात्याने आणखी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे त्यामुळे शेतकरी वर्गाची आणखी चिंता वाढली आहे.