हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांची वर्णी

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे. यात दक्षिण नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांची आश्चर्यकारकरित्या हिंगोली मतदारसंघात वर्णी लागली आहे.

हिंगोली हा विदर्भाला चिकटून असलेला मतदार संघ आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव, किनवट मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाची गणिते तशी सोपी वाटत असली तरी ती गुंतागुंतीची आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात भाजप-शिवसेनेचा प्रभाव आहे. त्यासोबतच २०१४ मध्ये मोदी लाट असताना राजीव सातव यांना आपली जागा राखता आली होती. त्यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा पराभव केला होता.सतराव्या लोकसभेसाठी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुकांनी आपली ताकद आजमावायला सुरुवात केली होती.

लोकसभा सतराव्या निवडणुकीसाठी आपला दावा अधिक मजबूत असल्याचे वसमतचे शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा सांगत होते. त्यांनी गेल्या आठ महिन्यांपासून मतदारसंघ बांधणीलाही प्रारंभ केली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीलाही ते लागलेले होते. त्यांच्यासोबत नांदेडचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील तसेच डॉ. बी. डी. चव्हाण हे देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मुंदडा यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मतदारसंघाची रचना पाहता नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील मोठा प्रदेश या मतदारसंघात येतो. या ठिकाणी भाजप शिवसेनेचा जोर असल्याने तेथील उमेदवाराला संधी देण्यास पक्षश्रेष्ठी पसंती देतील, असे चित्र होते. त्यासोबतच त्यांना शिवसेनेतून कार्यकर्त्यांचाच विरोध असल्याने त्यांना उमेदवारी नाकारल्याची चर्चा सुरु आहे.कॉंग्रेसकडून राजीव सातव यांनी आपल्या उमेदवारीचे पत्ते उघडले नाहीत. त्यामुळे आता कॉंग्रेसकडून हेमंत पाटील यांना टक्कर देण्य़ासाठी खुद्द राजीव सातव समोर येतात की, आणखी कुणाला संधी दिली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं आहे.