… म्हणून चंद्रकांत पाटलांनी पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवली : मंत्री उदय सामंत

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वेळी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचा अगदी निसटता विजय झाला होता. बंडखोरी झाली नसती, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. यावेळी पदवीधरच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीनेच त्यांनी पुण्यात जाऊन विधानसभेची निवडणूक लढवली, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State BJP president Chandrakant Patil) यांना लगावला.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार मेळाव्यात ते शनिवारी (दि. 21) सांगलीत बोलत होते. यावेळी मंत्री सामंत म्हणाले, महाविकास आघाडीची ताकत वाढली आहे. राज्यातील विधान परिषदेच्या पाचही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. बिहारमध्ये तुम्ही काहीही केले असेल, पण महाराष्ट्रात तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे काही वाकडे करू शकणार नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने सरकारकडून शाळा सुरू करण्याची घाई होणार नाही. शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन, शाळा आणि पालकांवर सोपवण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आचारसंहिता संपताच सुरू होणार
प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीच्या स्थगितीबाबत विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. काेरोना संसर्गामुळे काही कालावधीसाठीच भरती स्थगित होती. विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Elections) आचारसंहिता संपताच प्राध्यापक आणि प्राचार्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी सांगितले.