‘गृह’ आणि ‘नगरविकास’ शिवसेनेकडे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन 15 दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. मात्र आज तीनही पक्षांच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये खातेवाटपचा तिढा सुटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गृह आणि नगरविकास या दोन खात्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच होती. अखेर गृह आणि नगरविकास खाते शिवसेनेकडे राहणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. दरम्यान, मंत्रीमंडळाचा विस्तार 23 आणि 24 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, खातेवाटप करण्यात आले नव्हते. महत्वाच्या खात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एकमत झालेले नव्हते. अखेर आज झालेल्या बैठकीमध्ये गृह आणि नगरविकास खाते शिवसेनेकडे तर गृहनिर्माण आणि अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली मात्र, त्यांना खाते वाटप झाले नव्हते. अखेर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांना खाते वाटप करण्यात येणार आहे. जेणे करून हे मंत्री अधिवेशनामध्ये त्यांच्या खात्याच्या बाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकतील. दरम्यान, गृह खाते राष्ट्रवादी आपल्याकडे घेणार असून हे खाते अजित पवार यांना मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, आजच्या बैठकीत गृह खाते शिवसेनेकडे गेल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Visit : Policenama.com