शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कायदा करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

अमळनेर : पोलीसानामा ऑनलाईन – शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत, त्यामुळे फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, वरणगाव येथे एसआरपीफ बटालियन सुरु करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली.

अमळनेर येथील पोलीस वसाहतीचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.अनिल देशमुख म्हणाले, की महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशमधील दिशा कायद्याप्रमाणे कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात येईल.

शेतकऱ्यांविषयी न्याय देण्याची मोहिम राबविल्याबद्दल आणि कायद्याची मागणी करणाऱ्या प्रतापराव दिघावकर यांचे गृहमंत्री देशमुख यांनी अभिनंदन केले.

प्रतापराव दिघावकर म्हणाले, नाशिकचा पदभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांची फसवलेली ५ कोटी रक्कम परत मिळवून दिली आहे. १६६ व्यापाऱ्यांकडून दिवाळीपूर्वी रक्कम परत करण्याचे लेखी लिहीन घेतले आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या समोर शेतकऱ्याला बसायला खुर्ची मिळेल तोपर्यंत पोलीस स्टेशन लोकाभिमुख होणार नाही. असेही त्यांनी सांगितले.