आदित्य ठाकरेंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला गृहमंत्र्यांकडून ‘झटका’, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे युवानेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच मुंबईमधील नाईट लाईफचा निर्णय हा लांबणीवर पडला आहे. कारण २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरु होणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामुळे आता मुंबईमधील नाईट लाईफवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने आली असल्याची चर्चा सगळीकडे आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, नाईट लाईफ सुरु करण्यासाठी सध्याला पाहिजे तेवढा पोलीस स्टाफ उपलब्ध आहे की नाही याची खात्री करण्यात येणार आहे. तसेच येत्या कॅबिनेटमध्ये याबाबतीत सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे मुंबईतील नाईट लाईफबाबत नक्की कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘पुन्हा सुरू होणार मुंबई पोलिसांचं अश्वदल’
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले की मुंबई पोलिसांचं अश्वदल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याआधी मुंबई पोलिसांकडे अश्वदल होतं परंतु १९३२ साली हे दल बंद करण्यात आलं होतं. आता हे दल तब्बल ८८ वर्षांनंतर सुरु करण्यासाठी पाऊले उचलली जाणार आहेत.

कसं असणार अश्वदल?
या अश्वदलाचा वापर पेट्रोलिंग आणि ट्रॅफिकसाठी केला जाणार आहे. हे युनिट २६ जानेवारीपासून सुरु होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या या अश्वदलामध्ये ३० घोडे असणार आहेत. या युनिटमध्ये जवळपास १ सब इन्सपेक्टर, १ एएसआय, ४ हेडकॉन्स्टेबल आणि ३२ कॉन्स्टेबल असणार आहेत. या अश्वदलाचा वापर जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जाणार आहे. हिंसक जमावावर नियंत्रण करण्यासाठी हे अश्वदल महत्वाचं मानलं जातं अशी माहिती गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/