व्यावसायिकाकडून पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की ; पोलीस चौकीत गोंधळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार आल्याने पोलिसांनी हॉटेल व्यावसायिकाला चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलवले. परंतु ते आणि त्याचा सासरा व मेहुणा यांनी पोलीस चौकशी करत असताना त्याचे चित्रिकरण केले. त्याला पोलिसांनी विरोध केल्यावर पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांना तिघांनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार काऊन्सील हॉल पोलीस चौकीमध्ये मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीरज जैन, आकाश अशोक बन्सल, अशोक बन्सल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजमलखान पठाण यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज जैन याचे कॅम्प परिसरात हॉटेल आहे. त्याने एका व्यक्तीकडून व्यवसायासाठी ५५ लाख रुपये घेऊन ते परत केले नाहीत. त्यामुळे त्यांनी बंडगार्डन पोलिसांकडे याची तक्रार केली होती. याप्रकऱणी चौकशी करण्यासाठी त्याला काऊंसिल हॉल पोलीस चौकीमध्ये पोलीस उपनिरीक्षक पठाण यांनी बोलवले होते. त्यावेळी नीरज जैन, त्याचा सासरा अशोक बन्सल व मेहुणा आकाश बन्सल तेथे आले. पोलीस चौकशी करत असताना आकाश बन्सल याने त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पठाण यांनी त्याला चित्रिकरण करण्यास मनाई केली. परंतु, तरीही तो चित्रिकरण करत असल्याने त्याला थांबविले. परंतु, त्याचा राग आल्याने जैन याने पठाण यांना मारहाण केली. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही धक्काबुक्की करत पोलीस उपनिरीक्षक पठाण यांना जीवे मारण्याची धमकी दिली.