हाऊज द जोश ? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : वृत्तसंस्था – आगामी निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका कार्यक्रमात एकत्र आले. उद्धव ठाकरे यांना राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी पुरस्काराने गौरवण्यात आले. एका माध्यम समूहाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष बापट आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर काय प्रतिक्रीया देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी आभार मानताना उद्धव ठाकरे म्हणाले, दोन दिवस झाले जरा तोंड बंद आहे. कारण परवापासून (युतीची घोषणा झाल्यापासून) काय बोलावे हे सूचत नाही. असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यानंतर उद्धव यांनी मी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनाच हाऊज द जोश असे विचारु इच्छितो असे म्हटल्यावर, यावर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून स्मित हास्य केले.

त्यानंतर उद्धव यांनी, ‘आमच्या युतीबद्दल ज्यांना जे बोलायचं असेल त्यांना बोलुद्या, मैदानात आल्यानंतर बघू काय करायचं ते’ असं म्हणत विरोधकांना इशारा दिला. तसंच आता राजकारणावर भाष्य करणार नाही असं म्हटलं. यानंतर बोलताना उद्धव यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली आणि पाकड्यांच्या पेकाट्यात अशी लाथ बसली पाहिजे की पुन्हा उभं राहण्याची हिंमत व्हायला नको. याशिवाय सोहळ्याच्या सुरूवातीला उद्धव ठाकरे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना शेजारी बसायला खुर्ची देत ‘युती’ दाखवून दिली.