मीच राजीनामा देण्याच्या तयारीत : अशोक चव्हाणांची ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची लोकसभेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यांना अद्याप वेटिंगवर का ठेवले आहे ? अशी चर्चा सुरु असतानाच अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या एका चंद्रपूरच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी राजीनामा देण्याच्या मानसिकतेत असल्याचे विधान केले आहे. या संभाषणाची क्लिप सध्या समाज माध्यमावर चांगलीच व्हायरल होत आहे.

काय आहे ऑडिओ क्लिप –

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच नाराज कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना फोन करून आपले गाऱ्हाणे मांडले त्यावर माझे कुणीच ऐकायला तयार नाही. त्यामुळे मलाच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावासा वाटत आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या हतबल भावना व्यक्त केल्या आहेत.

त्या ऑडिओ क्लिप काय म्हणाले अशोक चव्हाण –

या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत अशोक चव्हाण म्हणाले की , ‘खाजगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषयच येत नाही. मी ती ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही. चंद्रपूरमध्ये सध्या राजकीय वातावरण वादग्रस्त झाले आहे. अशातच कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे हे माझं काम आहे. ‘

थोडक्यात अशोक चव्हाण यांनी या वृत्ताचं समर्थनही केलं नाही तसेच खंडनही केलं नाही. लोकसभेची उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख २६ मार्च आहे मात्र आद्यपही काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही.