पक्षांतराच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसेंना शरद पवारांकडून मोठा धक्का !

ADV

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश पक्का झाल्याचे बोलले जात होते. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शरद पवारांनी खडसेंना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या खडसेंनाच धक्का दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, एकनाथ खडसे हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही. पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. पवारांनी एकनाथ खडसेंना हा राजकीय धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

ADV

नागपुरात दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे आले होते. याठिकाणी त्यांनी पवारांची गुप्त भेट घेतली होती. त्यानंतर खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील भाजपा कार्यालयावरील नरेंद्र मोदींचा फोटो असलेला फलकही उतरविण्यात आला होता. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, पवार यांनी काल औरंगाबाद येथे दिलेल्या माहितीमुळे खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या खडसेंनाच हा धक्का असल्याचे बोलले जात आहे. आता खडसे नेमकी कोणती भूमिका घेतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कालच त्यांनी राज्यातील पक्षनेतृत्वाविरोधात केंद्रीय नेतृत्वाकडे पुराव्यासहीत तक्रार केल्याचे म्हटले होते. ही चारच माणसे असून त्यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे केंद्रीय नेतृत्वाला कळवल्याचे सांगितले. त्यामुळे खडसे येत्या काही दिवसात कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/