रोहित शर्मासमोर माझी ‘बोलती बंद’ : राहुल

पोलिसनामा ऑनलाईन – भारताचा धडाकेबाज फलंदाज लोकेश राहुल हा कॉफी विथ करण या चॅट शो मुळे नकारात्मक दृष्टीने चर्चेत आला होता. त्यानंतर काही काळ राहुलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नशीब आजमावले होेते. त्यामध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर राहुलचे टीम इंडियात पुनरागमन झाले. राहुलने न्यूझीलंड दौर्‍यात दमदार कामगिरी केली आणि स्वत:ला सिद्ध केले. महत्त्वाचे म्हणजे प्रसंगी यष्टीरक्षकाची भूमिका स्वीकारत त्याने संघाला एक उत्तम पर्याय मिळवून दिला. राहुलने काही विक्रमांना गवसणी घातली, पण मुंबईकर रोहित शर्मासमोर मात्र त्याची बोलती बंद होते, असे त्याने सांगितले आहे.

टी 20 संघात सलामीवीर म्हणून पहिली पसंती राहुलला असेल आणि मग मी अन शिखर धवन यांच्यात निवड होईल असे रोहितने म्हणणे हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. मी रोहितच्या फलंदाजीचा खूप मोठा चाहता आहे. मी आता त्याच्यासोबत क्रिकेट खेळून अनेक वर्षे झाली आहेत, पण अजूनही मी त्याच्यासोबत खेळत असलो की माझ्या मनात एक वेगळीच भावना असते. भलेभले क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला समोर बघून स्तब्ध होतात, तसेच माझे रोहितच्या बाबतीत होते. मैदानात असो वा मैदानाबाहेर असो, रोहितसमोर मला काय बोलावे हे पटकन सुचतच नाही, अशी भावना राहुलने व्यक्त केली. रोहितने अनेक वेळा मला पाठिंबा दिला आहे. माझ्यावर त्याचा विश्वास आहे हे त्याने अनेकदा दाखवून दिले आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून मी त्याचा आदर करतो. जेव्हा संघातील अनुभवी खेळाडू तुमच्यावर विश्वास दाखवतात, तेव्हा तुमची कामगिरी सुधारते. त्यातही जेव्हा तुम्ही संघात असूनही खूप वेळा अपयशी ठरता, तेव्हा तुम्हाला अनुभवी आणि ज्येष्ठ खेळाडूंचा पाठिंबा मिळाला तर तुमचा आत्मविश्वास दुणावतो, असेही राहूल म्हणाला.