.. तर मुख्यमंत्र्यांनी मला यामधून मुक्त करावं, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याची मागणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   मराठा आरक्षण आणि सारथी संस्थेच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापू लागले आहे. सारथी संस्थेबद्दल वक्तव्य केल्यामुळे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी याबद्दल राजकारण करत माझ्यावर आरोप होत असतील तर मला यातून मुक्त कार, अशी भूमिकाच मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सारथीच्या स्वायत्तता कुठेही संपलेली नाही. सारथीचं काम उत्तम पणे सुरू आहे. पत्रकार परिषद घेणारी भाजपचीच टोळी आहे, अशा आक्रमक शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच सारथी संस्थेबाबत माझी भूमिका दुपट्टी आहे, असे आरोप केले जात आहे. पण मी सारथीसोबत कोणतीच नकारात्मक भूमिका घेतली नाही. मी ओबीसी समजाचा नेता असल्यामुळे माझ्यावर असे आरोप केले जात आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

वडेट्टीवार म्हणाले, या संस्थेची व्याप्ती वाढवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरीही माझ्यावर असे आरोप होत असतील तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती करणार आहे की, राजकारण करत माझ्यावर आरोप होत असतील तर मला यातून मुक्त करा त्या ऐवजी या पदाची जबाबदारी एखाद्या मराठा नेत्याला द्या, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

वडेट्टीवारांकडून खाते काढून घेण्याची मागणी

राज्यातील 3 पक्षांच्या सर्कसमुळे मराठा समाजावर अन्याय होण्याची भीती आहे. सारथी बाबत एक समिती नेमली. त्यानंतर अहवाल आला. परत दुसरी समिती नेमली, मात्र हा अहवाल समोर मांडला जात नाही. मंत्री वडेट्टीवर यांच्याकडून या खात्याचा कारभार काढून घ्यावा, अशी मागणी क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन केली आहे. दरम्यान, उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर 9 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरेल, असा इशाराही क्रांती मोर्चाने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.